Thursday, August 23, 2012

ग्रंथपालांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षे


कॉलेजांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांपेक्षाही अधिक प्रमाणात ग्रंथांच्या सहवासात राहणाऱ्या ग्रंथपालांचा ग्रंथसहवास आता अधिक वाढणार आहे. कॉलेजांतील ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फेब्रुवारी २०११ पासून सेवानिवृत्त झालेल्या ग्रंथपालांना हा निर्णय लागू राहणार आहे. 

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित अनुदानित खासगी कॉलेजांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कॉलेजांमधील प्राचार्य , प्राध्यापक आणि शारीरिक शिक्षण संचालकांबरोबरच ग्रंथपालांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेतही वाढ झाली आहे. केवळ ग्रंथपालच नाही ; तर उपग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपालही या निर्णयामुळे ६२व्या वर्षी निवृत्त होणार आहेत. परंतु ही वाढ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विहीत अर्हतेनुसार नियुक्त केलेल्या ग्रंथपालांनाच मिळणार आहे. ही निवृत्ती वयोमर्यादा वाढ मिळविण्यासाठी ग्रंथपालांना कॉलेजच्या प्राचार्यांकडे आपल्या कामकाजाचा अहवाल आठ प्रतींमध्ये सादर करावा लागेल. प्राचार्यांकडून हा अहवाल विद्यापीठाकडे जमा केला जाणार असून , विद्यापीठामार्फत तपासणी झाल्यानंतर यासाठी उच्च शिक्षण संचालकांकडे शिफारस केली जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढविण्याच्या शिफारसीला मंजुरी देताना ग्रंथपालांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. लायब्ररीचे व्यवस्थापन , लायब्ररीतील पुस्तकांचे बारकोडिंग तसेच कम्प्युटरायझेशन , इ-लायब्ररीची उपलब्धता ,ग्रंथप्रदर्शनांचे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन , ग्रंथालय विकास चळवळीतील सहभाग अशा विविध बाबींचा विचार हा आढावा घेताना केला जाणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर ज्या दिवशी हे ग्रंथपाल पुन्हा कॉलेजमध्ये रुजू होतील त्या दिवसापासूनचा पगार त्यांना दिला जाईल. निवृत्तीनंतर पुन्हा रुजू होण्यापर्यंतच्या दिवसांचा पगार त्यांना मिळणार नाही. परंतु हा कालावधी पेन्शनसाठी वेतनार्ह सेवा म्हणून ग्राह्य धरला जाईल.

Source ::: Maharashtra Times, 24-08-2012, p.09. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15625556.cms

No comments:

Post a Comment